
देहूरोड/प्रतिनिधि : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजप्रबोधन, राष्ट्रप्रेम, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपणाऱ्या या दोन महान विभूतींना यावेळी विविध मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करून दोन्ही महापुरुषांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजकारण आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव केला. ते म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असतानाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या लेखणीतून समाजातील उपेक्षित, वंचित आणि श्रमिक घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले. त्यांच्या साहित्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना स्वतःची ओळख मिळाली आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली.

मोरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने अलीकडेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन “वाचन-लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित केला आहे. ही बाब त्यांच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान करणारी असून नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाणीवा अधिक दृढ कराव्यात. अण्णाभाऊंचे विचार, साहित्य आणि संघर्षमय जीवन हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला. ते म्हणाले की, ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्याचे महान कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. मराठीतील केसरी आणि इंग्रजीतील मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात जनजागृती केली आणि स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक बळ दिले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, घराघरात मर्यादित असलेला गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात आणून लोकमान्य टिळकांनी समाज संघटित करण्याचे प्रभावी माध्यम निर्माण केले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्य आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे.
यावेळी कैलास वानखेडे यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी टिळकांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक कोमल माने, पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळे, अतुल मराठे, लहू मामा शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, प्रवीण झेंडे, महावीर बरलोटा, मदन सोनिगरा, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिक्षक अजय चौधरी, मिकी कोचर, ह्यूमन राइट्स चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, विलास शिंदे, सुनंदाताई आवळे, राजाराम अस्वरे, दीपक चौगुले, विजय मोरे, देहूरोड आरपीआयचे अध्यक्ष अरविंद गायकवाड, गणेश कोळी, विजय पवार, संदीप बालघरे भक्ती कुरकुट, वैशाली आवघडे, शशी सप्पागुरू, सुरेश बागाव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल यांनी केले. त्यांनी दोन्ही महान विभूतींच्या कार्याचा गौरव करत अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. राजाराम अस्वरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोमल शिंदे, संजय साठे, कैलास वारके, प्रतीक धुतडमल, मनोज क्षिरसागर, संतोष खुडे, आर्यन खरात तसेच सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून सामाजिक समतेची प्रेरणा आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारातून देशसेवेची ऊर्जा घेण्याचा संदेश या संयुक्त कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

