
राजगुरुनगर, दि. २८ (लतीफ शाह): देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हेच आपले मुख्य ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन एअर कमोडर गणेश जोशी यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणे विभाग व खेड तालुका एज्युकेशन सोसायटी, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील खाजगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्था-चालकांची व मुख्याध्यापकांची बैठक २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या बाफना रंगमंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस महामंडळाचे राज्य प्रतिनिधी शरदचंद्र धारस्कर, उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी, पुणे विभागाचे अध्यक्ष गणपतराव बलवडकर, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर जोशी, सदस्य डॉ. प्रदीप शेवाळे, हिरामण सातकर, दतात्रय सांडभोर, गणेश घुमटकर, अँड संदीप भोसले, उर्मिला सांडभोर, रेखाताई क्षोत्रिय, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सुरुवात संस्थेचे मानद सचिव एअर कमोडर गणेश त्र्यंबक जोशी यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून केली.
या बैठकीत १५ शाळांच्या संस्थाचालकांनी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला. बैठकीमध्ये नविन शैक्षणिक धोरण, शासनाचे नियम, शाळांच्या मान्यतेसंबंधीचे प्रश्न, विद्यार्थी प्रवेश, शिक्षकांची उपलब्धता, गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न, RTE च्या विदयार्थ्यांची शासनाकडून मिळणारी फी व त्याबाबत घेणारा विलंब, ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना येणाऱ्या आर्थिक अडचणी यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध समस्यांवर आपली मते मांडली. महामंडळाच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी यांनी या बैठकीस मार्गदर्शन करताना सर्व इंग्रजी माध्यमांच्या संस्थानी एकत्र येउन शासनापर्यंत आपल्या अडचणी पोहोचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे, असे सांगितले. राज्यप्रतिनिधी शरदचंद्र धारस्कर यांनी सर्व संस्था चालकांना महामंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन केले.

बैठकीच्या समारोपाच्या भाषणात संस्थेचे मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी यांनी देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हेच आपले मुख्य ध्येय असले पाहिजे असे सांगितले व शाळा हा निकोप समाज निर्मितीचा एक महत्वाचा घटक आहे व शाळा हे निकोप समाज निर्मितीचे एक महत्वाचे माध्यम आहे. सर्व शाळांनी विदयार्थी केंद्रबिंदू मानून विदयार्थ्यांचा, शाळेचा, समाजाचा व प्रामुख्याने देशाचा विकास करावा असेही नमूद केले.
सदर बैठकीसाठी आनंद इंग्लिश मिडीयम. स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी विशेष पुढाकार घेतला तर मान्यवरांचे स्वागत व बैठकीचे प्रास्ताविक के. टी.ई.एस. स्कूलचे प्राचार्य गणेश देठे यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन तुळशीराम घोलप यांनी केले
