महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक प्रबोधन कार्यशाळेत प्रतिपादन

राजगुरुनगर, दि. १६ : शालेय समस्या निवारण करण्यासाठी संशोधन हा उत्कृष्ट मार्ग आहे. त्यासाठी शिक्षकांमध्ये संशोधनाचा दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी केले.
खेड तालुका सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक प्रबोधन कार्यशाळेत ‘शिक्षणातून संशोधनाकडे’ या विषयावर ते बोलत होते. बाफना रंगमंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, मुख्याध्यापिका संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशीराम मुठे, सुनीता ठाकूर, लतीफ शाह उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी विद्यालय व इंग्रजी माध्यम विद्यालयाचे १५० अध्यापक उपस्थित होते.
डॉ. अ.ल.देशमुख म्हणाले की, सध्या शाळांमधून अनेक उपक्रम सुरू आहे परंतु त्या उपक्रमांना कृत्रिम व उदासीन स्वरूप प्राप्त झालेले आहे. उपक्रमांच्या अतिरेकामुळे अध्यापकांवरील ताण वाढत चालला आहे. त्यामुळे उपक्रम असावे पण ते संशोधन पद्धतीने केल्यास उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय संक्रमित झालेलं आहे, त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे.

त्यासाठी शिक्षकांनी वेगळा विचार करायला हवा. आपल्या विद्यालयातील समस्यांचा अभ्यास करून त्या कशा कमी करता येईल यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे. त्यानंतरच विद्यालयाच्या गुणवत्तेवर विश्वासार्हता निर्माण होईल.
यावेळी मुख्याध्यापिका संध्या कांबळे यांनी कार्यशाळेचे प्रस्तावित केले. पर्यवेक्षक लतीफ शाह यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अर्चना गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सुनीता ठाकूर यांनी आभार मानले.
