महात्मा गांधी विद्यालयातील व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळेत प्रतिपादन

राजगुरुनगर, दि.११ : २१व्या शतकात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे करिअरच्या असंख्य नवीन संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान व आधुनिक कौशल्ये आत्मसात करून उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, असे प्रतिपादन डिजिटेक रोबोटिक्स इंडिया प्रा.लि.चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित गटे यांनी केले.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. ‘२१ व्या शतकातील तंत्रज्ञानातील संधी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा जाधव, तज्ज्ञ करिअर समुपदेशक विजय कचरे,सुनील पाटील, पर्यवेक्षक हौशीराम मुठे, ‘करिअर समुपदेशन’ विभागाचे समन्वयक लतीफ शाह, सुवर्णा कापसे, इयत्ता दहावीचे अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. गटे पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मिती, कल्पकता आणि कौशल्य क्षमता असते. या क्षमतेला योग्य दिशा मिळाल्यास, तो केवळ स्वतःचे नव्हे, तर रोजगाराच्या संधी निर्माण करुन देशाचे भवितव्य घडवू शकतो. यशामध्ये बुद्धिमत्तापेक्षा ध्येय, सातत्य आणि अविरत परिश्रम याचा मोलाचा वाटा असतो.
आजचे विद्यार्थी उद्याचे अभियंते, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि नेतृत्व करणारे नागरिक आहेत. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून अंगभूत क्षमता व कौशल्ये विकसित करणे होय. पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान, कौशल्य, संशोधन आणि उद्योजक या क्षेत्रातील संधी ओळखणे गरजेचे आहे.

व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे यांनी कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. संयोजन अध्यापिका सुवर्णा कापसे यांनी केले. अध्यापक ए.जे.इनामदार, रविंद्र घनवट, वर्षा गुट्टे, सचिन सांडभोर यांनी सहकार्य केले.
